बुलढाणा-अकोला जिल्हा सिमेवर अन् मन नदिच्या काठावर वसलेले गोळेगांव बुद्रुक हे गाव आहे. येथील अरुण सुखदेव सम्दूर यांचे चिरंजीव विशाल रंजना अरुण सम्दूरने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
विशालचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा गोळेगाव बुद्रुक येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण बुरुंगले हायस्कूल शेगांव येथे झाले. त्यानंतर अकरावी ते बारावीपर्यंत यशवंतराव चव्हाण सैनिक विद्यालय वाशिम येथे पूर्ण केले. पदवीचे शिक्षण विज्ञान शाखेत देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथून पूर्ण करून थेट स्पर्धा परीक्षेकडे वळले.
स्पर्धा परीक्षा देत असताना, कोणत्याही परिस्थितीचा बागुलबुवा न करता जिद्दीने यशाची बीजे पेरली. यश नक्की मिळवू यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्यामुळे तो आपल्या ध्येयापासून यत्कींचित ही डळमळला नाही. २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत ४ मार्काने PSI होण्याचे राहून गेले.
त्यामुळेच नवी प्रेरणा मिळाली. त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची जिद्द सोडली नाही. त्याने सतत ४ ते ५ वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जीवन म्हटल्यानंतर चढउतार यायचे त्याचप्रमाणे त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या जीवनात सुद्धा अनेक चढउतार त्याने अनुभवले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी त्यांनी स्वतःचे असे एक वेळापत्रक बनवले.
जिद्द चिकाटी,मेहनत,नियोजन, संयम आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन या गोष्टीला प्राधान्य देऊन त्याने नुकत्याच घोषित झालेल्या निकालात विशालने हे यश मिळवलेले आहे. विशाल आता जलसंपदा विभागात मोजणी दर पदावर कार्यरत आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि महसूल सहाय्यक या दोन पोस्टवर एकाच वेळी निवड झालेली आहे.
गोळेगांव बुद्रुक गावातील आजपर्यंत पहिला MPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेला विशाल अरुण सम्दूर ठरला आहे. हे युवकांसाठी प्रेरणादायी आहे. याबद्दल विशाल आणि त्यांच्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होत आहे.