प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!
बुलढाणा : ‘उत्सव मराठी मातीचा, उत्सव निधड्या छातीचा.. महोत्सव मानवजातीचा!’ ही मोठी संकल्पना घेऊन मराठी मनाचा श्वास व जगण्याचा विश्वास असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती जिल्हा मुख्यालय असणार्या बुलढाणा शहरात विविध प्रबोधनात्मक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी होत आहे. २०१६ पासून बुलढाण्यात शिवजयंती सार्वजनिक स्वरुपात १९ फेब्रुवारी रोजी सुरु झाली, तत्पुर्वी तिथीनुसार व्हायची. यावर्षी प्रथमच ही जयंती १४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान साजरी होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२५ अंतर्गत बुलढाणा शहर समितीने विविध कार्यक्रम आयोजीत केले आहे. त्यात शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील गाजलेले विनोदी कीर्तनकार हभप.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे ‘शिवकीर्तन’ होणार आहे. तर विविध सांस्कृतिक स्पर्धा दरम्यानच्या काळात होणार आहेत. त्यात प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, पोवाडे स्पर्धा व गडकिल्ले स्पर्धा अशा स्पर्धांचा समावेश आहे. यात शाळकरी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
रविवार १६ फेब्रुवारी रोजी अभी-अम्मु यांचा शिवगीत, लोकगीत, गोंधळ, स्फुर्तीगिते असा गाजलेला भव्य-दिव्य कॉन्सर्ट शो सादर होणार आहे तो सायंकाळी ७ वाजता ‘शिवशंभो गर्जना’ या नावाने. सध्या महाराजांची आग्रा वरुन सुटका हा विषय गाजत असून याच विषयावर रायगडचे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान सोमवार १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. स्पर्धा परिक्षा तथा विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवराय व आजचा युवा’ या विषयावर डॉ.विठ्ठल कांगने सर यांचे प्रेरणादायी व्याख्यान मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. तर ‘महाराष्ट्राचा शाहिरीबाणा’ हा युवा शाहिर विक्रांतसिंह राजपूत यांचा कार्यक्रम मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. सर्व कार्यक्रम ‘शिवनेरी’ जिजामाता प्रेक्षागार टिळक नाट्य मंदीरामागे आयोजीत केल्या गेले आहेत.
मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता शिवज्योत व मोटरसायकल रॅली तर याशिवाय कार्यक्रमस्थळी १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवकालीन नाणेप्रदर्शनी व छायाचित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. तर याशिवाय पुर्वसंध्येला दिपोत्सव होईल.
शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला मुख्य सभा स्थळी सकाळी शाहिर डी.आर. इंगळे प्रस्तुत ‘शिवपहाट’ हा कार्यक्रम होईल. शिव जन्मोत्सव सोहळ्यात शिवरायांचा पाळणा, समुहगान व सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शिवसोहळा’ होईल. त्यानंतर भव्य कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता ‘शिवस्मारक’ संगम चौक येथून भव्य-दिव्य सांस्कृतिक शोभायात्रा निघेल, तिचा समारोप सायंकाळी १० वाजता ‘भारतमाता’ कारंजा चौक याठिकाणी होईल.
याशिवाय ५१ रंगीत तोफांची सलामी, विविध रेजीमेंटची सलामी, सैनिकी शाळांच्या मुलांचे पथसंचलन तथा १९ फेब्रुवारीला सुर्योदय समयी छत्रपती शिवाजी महाराज मंदीरावर महापुजा, तिथून पालखी काढत शिवस्मारकावर शिवपुजन तर याच पायी दिंडीने कार्यक्रमस्थळी आगमन. याच ठिकाणावरुन विद्यार्थ्यांची रॅली, असे भरगच्च कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी राजकीय, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या शिवजयंती सोहळा व प्रबोधनात्मक तथा सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समितीने केले आहे.
शिवमहिमा महत्वाचा, नाममहात्म्य टाळले..
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव बुलढाणाच्या वतीने यावर्षी अनेक बदल करण्यात आले. निमंत्रण पत्रिकेत जी हजारावर नावे असायची, ती यावेळी टाळण्यात आली. अनेक दिखाऊ बाबींना फाटा देऊन प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर देण्यात आला आहे.
यावर्षीची मिरवणूक होणार डिजे.मुक्त..
जयंती उत्सव समित्यांमध्ये डिजे. मोठ्या प्रमाणात वाजवल्या जातात. परंतु यावर्षी बुलढाणा शहरात मुख्य समितीच्या वतीने एकही डिजे. बुक करण्यात आला नाही. उज्जैनचे डमरु व झांज पथक, ढोल पथके, एक बॅन्जो पथक तर खूप सांस्कृतिक झाकी ही आकर्षकता शोभायात्रेत राहणार आहे.